happy father day to all ! ! !
आज फादर डे , इंग्राजळेल्या संस्कृतीतील वडिलांबद्दल दिखावा प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस , मराठीत याचे भाषांतर " पितृदिन " असे होत नसावे कारण पितृदिन म्हटले कि त्याचा वेगळा अर्थ निघतो , असो
तर माझे वडील बाळासाहेब नाथू कुसाळकर , देवी निमगाव , कडा ( आष्टी ) बीड , या गावचे मूळ रह्वाशी , १९७२ च्या दुष्काळात आम्ही बीड जिल्यातून पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात कामानिमित्ताने स्थलांतरित झालो , स्थायिक झालो , त्या गावाशी समरूप झालो , वडिलांनी आपल्या पापभिरू स्वभावाने खूप लोक जोडले , माळ घातली , भजनात सहभाग घेतला , कीर्तन - प्रवचनात पडेल ती कामाची सेवा केली , पंढरपूरची वारी केली ,
आयुष्यात कधीही खास आजारी असे पडले नाहीत , किरकोळ थंडी तापाचा आजार हाच त्यांचा आजार , ते हि अंगावर काढायचे नाहीतर , प्राथमिक सरकारी दवाखान्यात जावून ५ पैशाचे एक स्लीप काढून एक इंजेक्शन मारून आले कि ठीक होणार , सरकारी दवाखान्यातील गोळ्या व इंजेक्शन यावर त्यांचा खूप विश्वास .
परंतु आयुष्याच्या शेवटी त्यांना आजाराने घेरले , कधी मुंबई तर बर्याचदा पुणे असे दवाखाने करत करत ते अचानक आम्हाला सोडून गेले .
आमच्या वडिलांना दोन व्यसने होती , एक संभाजी अर्थात कोंबडा छाप बिडी ओढण्याचे व दुसरे कामाचे , दारू तेच काय त्यांचे इतर भाऊ सुद्धा कधी पीत नव्हते , त्यांचा वैयक्तिक खर्च काहीच नव्हता , ते एक उत्कृष्ट गवंडी होते , विहिरी व घरांचे काम खूप छान करायचे , ते दगड घडण्याचे काम हि खूप छान करायचे , परंतु पुणे जिल्यात आल्यापासून दगड - खाणीत कामाला जायला लागायचे ,
त्या काळी हाताने सुरुंग घ्यावा लागत असे , भल्या पाहटे उठून , उजडण्याचा आत ते खाणीवर जात व १० / ११ वाजे पर्यंत त्यांचा एक ४ /५ फुट सुरुंग मारून होई , त्यानंतर तो उडवायची लगीन - घाई त्यांची चालायची , विरया ( कि युरया ) , सुरुंगाची दारू , सुरुंगाची काळी सुतळी , सुरुंगासाठी लागणारे मीठ , हे सारे ते घरात एका कोपऱ्यात खूप जपून ठेवायचे , ते सुरुंग चेळताना , खूप काळजी घ्यायचे ,
सुरुंग भरताना बारीक दगडाचे तुकडे , कच ,युरया , दारू , मीठ , हे ठासून न चाळता काळजीपूर्वक भरायचे , त्यांनी या कामात निष्काळजीपणा कधी केलेला आठवत नाही , कधी धडीला सुरुंग घेतलेला असेल तर सुरुंग पेटवल्या नंतर त्यांची खूप त्रेधा उडायची , कधी कधी सुरुंग फुसका जायचा , अशावेळी वडील खूप निराश व्हायचे कारण हाताने सुरुंग घेणे एवढे सोपे नसायचे व हाताला फोड येण्याचा प्रश्नच नव्हता कारण तो हात मुलायम राहिलेलाच नसायचा , फोड येवून ते जागीच दाबून ते हात पुरते दगडासारखे निबर झालेले होते .
सुरुंग उडवायचे ठरले कि आजूबाजूला सगळ्यांना आरोळी ठोकून सावध करायचे , बायकांना व लहान मुलांना दूर जावून उभे राहायला सांगायचे कारण कधी कधी दगड खूप उंच उडत व ते दगड लागण्याची खूप शक्यता असायची , सुरुंग उडाल्यानंतर , किती दगड माल खाली पडला आहे हे पाहण्याची घाई असायची , चांगला माल पडलेला असेल तर सुतकी घेण्यासाठी त्यांचे हात आसुसलेले असायचे परंतु आईच सांगायची कि जेवून घेवून नंतर फोडायला सुरुवात करा . . .
नंतर एकदा सुरुवात केली कि त्यांच्यासाठी , सुतकी , दगड आणि पहार हेच विश्व असायचे , कधी आधी मधी दगड लागून जखमा व्हायच्या परंतु संभाजी बिडीचा लाल कागद त्याला थुका ( थुंकी ) लावून लावला कि ती बरी होणार हाच त्यांचा विश्वास असायचा व तोच लाल कागद त्यांचा दवाखाना असायचा .
एवढे सारे मरमर काम केल्यानंतर , आठवड्याच्या दिवशी वडील खाण - मालकाकडे सकाळीच पैशाला जायचे , खूप उशीर त्यांचेच थेर ऐकून घ्यायचे परंतु तो काही पैसे लवकर देत नसायचा , आई घरी पैशासाठी वाट पाहून हैराण व्हायची कारण आठवड्याचा बाजार असायचा व लवकर गेले तर काही मिळण्याची शक्यता असायची . . हे खाण - मालक खूप अंत पाहायचे , , , परंतु नाविलाज असायचा . काही जणांना तर ३ /४ वाजेपर्यंत थांबून हि पैसे मिळत नसत तर काहीजण अगतिक होवून आर्जवे करायची पण त्या खाण - मालकाला कधी दया यायची नाही . असो
आमच्या चार भावांचे शिक्षण , घर , हे वडिलांनी कसे केले असेल काही सांगता येत नाही , आज वडिलांच्या भूमिकेत मी हि आहे , किती जड जात आहे याचा मला पूर्ण अंदाज आहे परंतु त्यांनी पूर्ण भोळे राहून , कधी हि कुणाला न दुखावता , गावातील लोकांशी एकरूप होवून खूप चांगले दिवस काढले , म्हणून आज हि गावातले लोक त्यांचे नाव काढतात , परंतु म्हातारपण हे वाईटच असते .
वडिलांनी फक्त एकदाच मला एक वीज चमकवनारी चापट हाणली होती , त्याशिवाय त्यांनी मलाच काय कुणालाही मारलेले आठवत नाही , मी लहान होतो व आई ला फिरून काहीतरी बोललो होतो व निघून जाण्याची काहीतरी गोष्ट केली होती , वडिलांनी एक सणसणीत ठेवून दिली होती , ती अद्याप लक्षात आहे . त्यांचे सगळे प्रेम पाठीमागून असायचे , समोर काहीच दाखवत नसत .
आम्ही सर्व आमच्या वडिलांना " अण्णा " म्हणायचो , काहींचे ते बाळभाऊ होते तर काहींचे बाळ दादा . वडिलांना कुणीही काम सांगावे वडील ते लगेच करायचे , कुणी हलके काम सांगितले व वडील ते करायला लागले तर आम्हाला कमीपणा वाटायचा , आम्ही वडिलांना बोलायचो , परंतु ते वडील कधी मनावर घेत नसत व म्हणूनच गावात जेंव्हा हरीनाम कीर्तन सप्ताह भरायचा तेंव्हा वडील खूप मिरवायचे , टाळ घेवून उभे राहायचे , त्यांनी गावातील काकडा ( पहाटेचे बोलायचे अभंग ) जसे ते जायला लागले तसा कधी सोडला नव्हता .
असे आमचे अत्यंत साधे , सरळ , ,सज्जन , भोले , पापभिरू वडील , कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसायचे , सामंजस्य हीच त्यांची सदैव भूमिका असायची .
वडील गेले तो क्षण खूप हृदयदावक होता ,वडील जात आहेत हे समोर दिसत होते परंतु हतबलता होती. . . असो त्यावर परत कधीतरी . . .
आज फादर डे निमित्ताने माझ्या वडिलांना माझ्या या स्मुर्ती पुष्पांजली ! ! !
No comments:
Post a Comment