Friday, June 20, 2014

क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |



क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |

नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |

संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।

तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।

---------------- संत तुकाराम महाराज

आपले हिंदू धर्म शास्त्र हे प्रामुख्याने कर्म सिद्धांतावर आधारलेले आहे , त्यातील मुख्य धर्म ग्रंथ म्हणून आपण " श्रीमद भागवतगीता " ग्रंथाला विशेष महत्व देतो व त्यातील युध्द भूमीवरील श्रीकृष्ण - अर्जुन संवाद म्हणजे अध्यात्मातील अतिउच्च अनुभव आहे . व त्यात अर्जुन आपल्या भावंडाना / नातलग / जेष्ठ व वंदनीय गुरु समान व्यक्तींना युद्धासाठी आपल्या समोर पाहून भांबाहून जातो . अशा पार्श्वभूमीवर अर्जुनाला केलेला श्रीकृष्णाने उपदेश म्हणजेच गीता होय , ह्या गीतेला आधुनिक संत विनोबा भावे " गीताई " असे म्हणत , महात्मा गांधीनी सुद्धा शेवटपर्यंत आपल्या आयुष्याचा आदर्श म्हणून गीतेलाच सर्वोच्च स्थान दिले होते व ते त्याचे रोज नित्य नियमाने पठाण करत असत . लोकमान्य टिळकांची विद्वत्ता व त्यांचा व्यासंग व त्यांचे अध्यात्मातील श्रेष्ट्त्व अनुभवायचे असेल तर त्यांनी लिहिलेल्या " श्रीमदगीतारहस्य " अर्थात कर्मयोग शास्त्र हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ अवश्य पहावा . लोकमान्य टिळक तर ठासून सांगतात कि सर्वात श्रेष्ठ हे कर्मच आहे व गीतेमध्ये सुद्धा तोच विषय प्रतिपादित केलेला आहे .

आपल्या महाराष्ट्रातील संत कुळातील संत महात्म्यांनी सुद्धा कर्माला अधिकाधिक महत्व देवून ते सामान्य जणावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे , संत तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला कर्मच कसे श्रेष्ठ आहे व आपण क्षणा - क्षणाला त्याचा कसा विचार केला पाहिजे व का विसर पडू दिला नाही पाहिजे हे हे सांगत आहेत . संतानी आपल्या अभंगात अनेक ठिकाणी असे लिहून ठेवलेले आहे कि कर्म हे तीन प्रकारचे असतात. ( १ ) प्रारब्ध ( २ ) संचित ( ३ ) क्रियमाण असे तीन प्रकार होत . प्रारब्ध व संचित हे पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारे फलित असतात परंतु क्रियमाण म्हणजेच वर्तमानात अर्थात सद्यस्थितीला जे आपण कर्म करत असतो ते होय . एखादी व्यक्ती हि दैवहीन , धनहीन , व गरीब असू शकते त्याला आपले पुढील आयुष्य शेवट पर्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे असल्यास , त्याचे व्यावाहारार्थाने म्हातारपण चांगले जावे असे वाटत असल्यास व त्यानंतर हि आपल्या जीवनाची व शरीराची आबाळ होऊ नये असे वाटत असल्यास त्याने आपले वर्तमानातले क्रियमाण हे सतत चांगले ठेवले पाहिजे व सतत कार्यरत राहिले पाहिजे . अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास आपल्या आत्म्याला ईश्वराचे अनुभूती मिळून आपल्या आत्म्याला पुढील जन्मी चांगली जन्मयोनी प्राप्त होवून आपल्या आत्म्याला मोक्ष - प्राप्ती मिळावी असा आहे . मोक्ष - प्राप्ती जरी खूप लांबची गोष्ट असली तri , आहे हे आयुष्य सुसह्य होवून आपल्याला शेवट पर्यंत आयुष्य सुख - समाधानात , आनंदात घालवता आले तरी खूप आहे .

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही .

आपल्या मानवाचे व एकूणच प्रत्येक जीवाचे असे एक आयुष्यमान ठरलेले असते . तेवढे आयुष्य झाले कि त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो . परंतु त्यातील बरचसे दिवस हे असेच वाया जात असतात . १ ५ / २ ० वर्षे हे बालपणातच जातात , पुढील १ ५ / २ ० वर्षे हे जवानी अर्थात तरुणपणात म्हणजेच " मी पणा " करण्यात जातात . शेवटचे १ ५ / २ ० वर्षे हे अंथरूण धरून म्हातारपणात जातात व ह्या काळात आपलीच मुले आपली लायकी काढत असतात , हिडीस - फिडीस करत राहतात , डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नसतो व त्या म्हातारपणात काय करावे तर कुठलेही इंद्रिये निट काम करत नसतात . ह्या म्हातार्या माणसाची लोक " जायचीच " वाट पाहत असतात . अशातच ४ ० / ४ ५ च्या काळात लोकांना थोडेफार शहाणपण आलेले असते परंतु त्यांना संसार व " वारस " ह्यांची जास्त फिकीर असते व माणूस स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष्य करतो व शेवटी त्याच्या आयुष्याची परवडच होते , शोकांतिका होते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वाना " सावधान " करत आहेत …क़ि बाबानो तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे आता तरी तुम्ही सावध व्हा , आता तरी तुम्ही संतांची संगती धरा , आता तरी तुम्ही विचार करा कि ह्या आयुष्यात नुसतेच भवरा होएउन फिरायचे कि आपल्या स्व - स्वरुपाची ओळख करून घ्यायची ? ( माणसाने / व्यक्तीने असा विचार हा तरुण असल्या पासूनच करायला पाहिजे , तरुण पणात त्याच्या अंगी ताकद असते , शरीर पाहिजे त्या गोष्टीला साथ देत असते , काळ हि अनुकूल असतो , फक्त संगती हि संत - सज्जनाची असावी )

संत हे ढोबळ अर्थाने व्यक्तीला संबोधित असले तरी संत हि उपमा जे अध्यात्म जाणतात त्यांना माहित आहे कि ती संज्ञा हि व्यक्तीला नसून " ज्ञानाला " आहे . व्यक्ती हि प्रकृती स्वरूप असल्याकारणाने त्या मध्ये अनेक विकृती असण्याचा संभव असतो . परंतु हे ज्ञान हे हि काही असामान्य अशा संत महात्म्याकडेच असते , म्हणून त्यांच्या कृपा , दया , करुणारुपी सहवासात ह्या ज्ञानाची आवड मनात धरावी .

परमार्थ ह्या शब्दाची फोड परम + अर्थ = परम अर्थ अशी आहे , परम म्हणजे अति उच्च , अगदी शेवटचे , सर्वात शेवटचे ,सर्वोच्च , उत्तम ( ह्या नावाचे काही शब्द पहा ,… परमेश्वर , परमवीर ( चक्र ) , परमात्मा , परम कॉम्पुटर ( भारतातील सर्वात शक्तिशाली कॉम्पुटर ) परमधाम इ . इ . ) . तर परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ ह्या विश्वाचे जे गुह्य आहे , ह्या विश्वाच्या ईश्वराला जाणून घेण्याचे जे साधन आहे ते म्हणजे ज्ञान होय व त्या ज्ञानाच्या आधारानेच संत संगत धरून आपण ते ज्ञान प्राप्त करून घेवू शकतो व ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सर्व सामान्य साधक विपरीत / प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वांशी प्रेमाने , सौदार्हाने वागून आपले जीवन समाधानाने व्यतीत करू शकतो .

परंतु शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करत आहेत कि ,… ह्या इहलोकीच्या व्यवहारात म्हणजे , आपल्या जगात / समाजात विभिन्न प्रकारचे लोक असतात , अनेक वृत्तीचे / प्रकृतीच्या व्यक्ती असतात , मोहवणारे अनेक क्षण येतात , लालसा निर्माण करून गोत्यात आणणारे अनेक प्रसंग उद्भवत असतात , प्रलोभने , विषय - वासना ह्या मुद्दाम हून सज्जनाच्या अवती भोवती येत असतात अशा वेळी भक्ताने / सज्जनाने सदा सजग व सावध राहायला हवे , कामांध व्यक्तीला जसे काम तृप्ती शिवाय काहीच दिसत नाही , पुत्र - प्रेमापुढे जसे पित्याला धृतराष्ट्रा सारखे फक्त आपल्याच पुत्रांचे हित दिसते व तो आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करतो व आपले स्वताचे हनन करून घेतो तसे ह्या मायिक दुनियेत अशी वेळ येते कि काही क्षण आपल्याला काय करावे ते काहीच कळत नाही , जसे आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर काही क्षण आपल्याला काहीच कळत नाही व तेवढ्या वेळात आपल्या कडून डोळे चोळत चोळत पुढील काहीच दिसेनासे झाल्यामुळे काहीतरी अघटीत होवून जाते व नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते . म्हणून तुकाराम महाराज इथे आपल्याला रोकडा परमार्थ व व्यवहार शिकवतात कि आपण आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर / अज्ञानाची पडळ / अज्ञानाची काजळी येवू न देता सदा सावध राहून क्षणा-क्षणाला आपले आयुष्य अधिक सुंदर बनवता येईल .

No comments:

Post a Comment