बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ?
पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।
नारळ , खजूर , या सारखे काही झाडे असतात ती खूप उंच वाढतात , त्यांची फळे खूप चांगली असतात , मधुर असतात , त्यांची स्वताची अशी खास गोडी असते परंतु दुर्दैव असे असते कि ते हाताला लागतील अशा अंतरावर नसतात .
…. अशा झाडा जवळ गेल्यानंतर व्यक्ती कितीही भुकेला , थकलेला , तहानलेला असेल तरी त्याला त्याचा थोडा थकवटा घालवण्यासाठी , त्याला ह्या झाडाखाली उन्हापासून सरंक्षण होईल अशी सावली सुद्धा मिळत नाही . उंचावर पाहिले तर गोड अशी फळे दिसत असतात परंतु अनेक प्रयत्ना नंतर ते हाताला लागत नाहीत व शेवटी अशा झाडाजवळ गेल्या नंतर पदरी निराशाच पडते .
वरील उपमा हि अशाच वृत्तीच्या लोकासाठी वापरली गेलेली आहे , काही व्यक्तींचे खूप नाव झालेले असते , त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय असते परंतु अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर खूप भ्रम निराशा होते , एवढी कि असल्या व्यक्ती बद्दल पुढे पुढे अन्तर च ठेवूशी वाटते …
…. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी व समाजासाठी हि काहीही कामाची , उपयोगाची नसते . समाजापासून अथवा जमिनीपासून आपली नाळ तुटलेली असते व त्यांच्या वाढलेल्या अपेक्षांना समाज पुरे पडत नसतो . असो .
या बाबतीत मला काही बालपणाच्या गोष्टी आठवतात , ज्या निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो , रानावनात , जंगलात हिंडलो , बागडलो त्यातील काही अनुभव मला ह्या बाबत आपणाशी शेयर करुशी वाटत आहेत .
मी लहानपणी जेंव्हा डोंगरात , जंगलात , शेतात , रानावनात फिरायचो तेंव्हा अनेक गावरान मेवा व फळांचा आस्वाद घ्यायचो . रान फळामध्ये मला खूप आवडणारे फळ म्हणजे निवडुंगाचे बोडं , बोरे , चिंच आंबे इत्यादी .
निवडुंगाच्या बोंडाची गंमत अशी होती कि ते मिळवण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात खूप आत पर्यंत जावे लागत असे , निवडुंगाचे झाड जरी सापडले तरी त्यावर आलेले पिकलेले बोडं शोधणे हे अनुभवाचे काम असते . निवडुंगाच्या झाड हे खूप अडचणी मध्ये असते , त्याच्या आजू बाजूला काही सरपटणारे प्राणी असण्याची खूप शक्यता असते . त्यातून हि मार्ग काढून मधुर अशा बोंडा पर्यंत पोहोचायचे म्हणजे निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे हे ठरलेलेच . बर्याच प्रयत्नांनी असे एखादे बोंड मिळवले व ते खाण्याला सुरुवात करायची म्हटले तर ते आहे तसेच खाता येत नाही कारण त्यावर खूप काटे असतात व ते बाजूला करून आतील लाल लाल मधुर फळ चाखायची मजा काही औरच असते . हि गोष्ट इथेच संपत नाही आतल्या लाल गरामध्ये सुद्धा अति सूक्ष्म काटेरी जिभेला भयंकर टोचणारी असे काटे असतात . इथे हि अनुभव च कामी येतो . जो अनुभवी व्यक्ती , माहितगार असतो केवळ तोच ह्या निवडुंगाची फळे चाखण्यात यशस्वी होतो व मधुर फळाचा आस्वाद घेवू शकतो .
आम्ही रानात फिरताना आम्हाला बोराची कुठली झाडे आंबट , कुठली तुरट , कुठली किड्यांनी भरलेले व कुठले मधुर , गोड , व चव टिकून राहणारी होती , हे आम्हाला खूप चांगले माहित असायचे . आम्ही एका चांगल्या पिकलेल्या बोरासाठी अनेक प्रयत्न करून ते मिळवायचोच . आणि त्याच वेळी जी आंबट , कडू व किडकी फळे असलेल्या झाडांकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नव्हतो .
हीच गोष्ट चिंचेच्या झाडाची . ज्या चिंचेच्या झाडाला चवदार व आंबट गोड चव असेल त्याच झाडाकडे आमचे लक्ष असायचे परंतु अत्यंत आंबट , कडवट असणाऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या तर दिसत असायच्या परंतु त्या चिंचेच्या झाडाचे अंगभूत गुण सगळ्यांना माहित असल्यामुळे कुणी तिकडे फिरकत हि नसायचे .
अगदी तशीच गोष्ट आंब्याच्या झाडांची , काही झाडांना येणारे आंबे हे बारीक असायचे परंतु त्याची चव अशी काही असायची कि कितीही उंचावर पाडाचा आंबा दिसला कि तो आमच्या हातून सुटत नव्हता . परंतु काही आंब्याची झाडे नुसतेच मोठाले परंतु चवीला आंबट तर काहींच्या नुसत्याच कोया मोठ्या , आकाराला आंबा मोठा परंतु रसाला काहीच नसायचा , काही आंब्यांच्या झाडाला येणारे आंबे हे खूप केसाळ तंतुमय त्यामुळे आम्ही त्या झाडाकडे लक्षच देत नसायचो .
. . . . . . मला आज असाच एक समाजाचा मोठे नाव असलेला माणूस भेटला परंतु त्यांचे समाजा बद्दलचे विचार ऐकून मी खूप विचारात पडलो .एवढे नाव कमावलेला माणूस आहे , ज्याचे नाव समाज खूप आदराने घेत आहे परंतु त्याचे समाजा बद्दलचे विचार ऐकून आमचे मन कडवट झाले .
नारळ व खजूर हि फळे तशी आरोग्य व शरीराच्या पोषकतेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत , त्याची फळे हि तंत्राने मिळवता येतात , असली झाडे हे अहंकाराने ताडा-माडा सारखी उंचच उंच वाढलेली असली तरी ती फळे त्यांच्या उपयोगतेते मुळे आपण अनेक प्रयत्न करून मिळवू शकतो …परन्तु ?? ? ?
……. परंतु तुरट , कडवट ,आंबट , किडक्या फळाप्रमाणे समाजातील काही व्यक्तींचे आपण आपला म्हणून खूप गुणगान गातो परंतु त्यांचा समाजाला कितीसा लाभ भेटतो हे पाहिले कि प्रश्न चिन्हच उभे राहते .
एक मराठी म्हण आहे व एका जुन्या मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता . .
" सर्जा , तुझा काहीहि उपयोग नाही , तू खायला काळ आणि भुईला भार आहेस "
समाजासाठी हि अशा काही भार असलेल्यांचा समाजाने जास्त विचार करू नये व काही कडू / आंबट झाडांकडे जसे आपण दुर्लक्ष करतो तसे यांना जास्त किमत न देता चांगल्या लोकांच्या शोधात रहावे .
आपल्या विचाराने , वागण्याने गोडवा निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींना समाजाने डोक्यावर घ्यावे .
No comments:
Post a Comment