आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे ….
मनसे " जातीचे राजकारण " करत नाही असे ऐकून आहे परंतु गरिबीला जात नसते व महाराष्ट्रात वडार समाज बांधवावर आता पर्यंत खूप अन्याय झाला आहे .
हाताच्या बोटावर मोजता येतील अशा तुरळक व्यक्तींना सोडले तर बहुतांश वडार समाज हा बेघर व बेरोजगार व त्यामुळेच अडाणी , व्यसनी व त्या अनुषंगाने अंधश्रध व अज्ञानी राहिलेल्या आहे . आज राज ठाकरे जी जीवनशैली जगत आहेत व आमचा वडार समाज जी जीवनशैली जगत आहेत यात दिवस - रात्रीचा फरक आहे .
आज वडार समाजाचे कित्येक तरुण राज ठाकरे यांच्या शब्दाखातर हातात दगड घेवून काहीही करायला आघाडीवर असतात .
राज ठाकरे यांच्याकडून खरे तर सुरुवातीच्या काळात खूपच अपेक्षा होत्या , त्यांनी महाराष्ट्र सुता सारखा सरळ करण्याची भाषा केली होती . उद्धव ठाकरे जेंव्हा शिवसेनेत नव्हते तेंव्हा पासून राज ठाकरे यांना आम्ही पहात , ऐकत आलो होतो त्यामुळे आमचे नैसर्गिक समर्थन हि त्यांनाच होते व आमचे शिवसेने वरील निस्सीम प्रेम नेतृत्व परिवर्तन झाल्यानंतर , पुत्र प्रेम आडवे आल्यानंतर कायमचे संपुष्टात आले . ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच घराणेशाहीवर कडाडून आसूड ओढले , पवार व नेहरू , गांधी कुटुंबावर घणाघाती ताशेरे ओढले व आम्ही ठाकरे वाक्य प्रमाण असे समजत होतो त्याला नेहमीसाठी तडा गेला होता . राज ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय मनात कुठेतरी जाणवत होता .
राज ठाकरे यांच्या त्याच प्रेमापोटी आमचा काहीही संबंध नसताना त्यांचा उमेदवार पडणार हे माहित असून हि आम्ही मनसे ला मतदान केले होते . एक संधी दिली होती .
परंतु वाघ जसा एकदा शिकार केल्यानंतर गुहेत जावून बसतो व परत कधीतरी येवून त्याला भुकेची आठवण झाली कि आरोळी ठोकतो तशी परिस्थिती आज मनसे ची झाली आहे . " खळ - खाट्यक " व वर्षातून अथवा सहा महिन्यांनी एखादी जाहीर सभा घ्यायची व वातावरण तयार करायचे हेच मनसेचे काम करायचे सूत्र झाले आहे कि काय कळत नाही .
टोल बंद करण्यासाठी आंदोलन , हे काय काम झाले ? सरकारने तसे धोरण बनवून चांगल्या पद्धतीचे रस्ते जनते साठी तयार केलेले आहेत . त्यात काही गुंडाड लोक घुसले आहेत हे खरे आहे परंतु setting चा हा खेळ महाराष्ट्राच्या जनतेला चांगला कळतो आहे .
मनसेची ताकत हि बहुत करून शहरात आहे व काहीतरी गडबडी करून ती प्रसिद्धीच्या झोतात नेहमी राहण्याचा प्रयत्न करत असतात . तसे पहिले गेले तर मनसे हि पूर्णत " event manage " करून उभी राहिलेला पक्ष आहे . त्यांचे event manage होणे जेंव्हा संपेल तेंव्हा पक्षाची अवस्था खूप अवघड असेल वाटते आहे .
मनसे ने सर्व सामन्यांच्या भावनांना हात घातला हे सत्य आहे , आम्हीही त्या भावनेला बळी पडलेलो एक होतो . परंतु ती भावना मनसेला माणसे जोडून ठेवण्यात जमलेले नाही हे मी माझ्यावरून ठाम पने सांगू शकतो .गेल्या ३ / ४ वर्षात मनसेचा कुणीही माणूस आमच्या भागात फिरकलेला आम्हाला दिसला नाही . याचा अर्थ मनसे हा पक्ष हि इतर पक्षा सारखाच आहे व वेळ आली तरच हा क्रियाशील होतो व आरोळी ठोकतो व जंगल दणाणून सोडतो .
मनसे जात / पात मानत नाही , हि गोष्ट आम्हाला हि भावते व आमचे वडार समाज बांधव हि त्या पक्षात खूपच कार्यरत आहेत हे आम्ही पाहतो आहोत .
परंतु थोडे राजकीय बोलायचे आहे म्हणून बोलतो आहे . किती हि जात / पात नाही मानले तरी शाळेच्या प्रमाण पत्रावरील जात जो पर्यंत संपत नाही व भारतातील आरक्षण जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत जात मानणे हे क्रमप्राप्त आहे . काही जातीवर इथल्याच काही स्वताला श्रेष्ठ म्हटल्या गेलेल्या जातींनी कित्येक शतके अमानुष असा अन्याय केलेला आहे . त्यांच्या पासून संधी हिरावून त्यांना सामाजिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या भयंकर असे खच्चीकरण केलेले आहे . त्यांना गुलामगिरीत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे . त्याचं आवाज सातत्याने दबला राहील यासाठी त्यांच्यावर सतत दबाव ठेवला आहे . त्यांच्यावर थोडीफार मेहरबानी करून त्यांचे अतोनात असे शोषण केलेले आहे .
आज २०१४ मध्ये हि वडार समाजाला ते या देशाचे मूलनिवासी असून सुद्धा त्यांना १९६१ चा रहवाशी असल्याचा पुरावा मागत आहे . सरकार हे कबुल करत आहे कि वडार समाज हा भटका समाज होता व आहे म्हणून व सरकार ला हे हि माहित आहे कि वडार समाज हा अशिक्षित व अज्ञानी व अंधश्रध आणि व्यसनी समाज होता म्हणून , असे असून हि सरकार या समाजाकडून अशी अपेक्षा करत आहे कि या समाजाने १९६१ साली त्यांच्या नोंदी ठेवलेल्या असतील . काय मूर्खपणा चालवला आहे या सरकारने व सत्तेतील व विरोधी पक्षातील लोकांनी .वडार समाजातील लोकाकडून तलाव , रस्ते , बंधारे व सरकारी इमारती बांधून घेणारे हेच , वडार समाजाला अज्ञानी व व्यसनात अडकवणारे हेच आणि हेच १९६१ चा पुरावा मागत आहेत .
संपूर्ण भारतात वडार समाज हा आदिवासी जमात म्हणून ST या कॅटेगरी मध्ये गणला गेलेला आहे परंतु या अतिशहाण्या ( पुरोगामी ) महाराष्ट्र सरकारने वडार समाजाला स्वतंत्र असे भटके - विमुक्त असा गट तयार करून त्यात अशा बर्याच जातींचा समावेश करून टाकलेला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत असे काहीही सांगितलेले नाही .
हे सर्व असे असताना २०१४ मध्ये आमचा वडार समाज उघड्यावर , बेघर , कुठल्याही सुविधा वाचून जगत आहे हे सरकारचेच नव्हे तर प्रत्येक पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे अपयश आहे , हि महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे .
सरकारमधील पक्ष व विरोधी प्रमुख पक्ष हे वडार समाजातील काही धनवान लोकांना वडार समाजाचे म्हणून ओळखत असतील परंतु खरा वडार बांधव हा दूर कुठेतरी दगडाच्या खाणी जवळ वस्ती करून राहत आहे , कुठेतरी रस्त्याच्या कडेला दगड घडवत बसलेला आहे , उन्हां तान्हात कुठेतरी मातीचे ढिगारे उचलत आहे त्यामुळे वडार समाजातील असे काम करणारे पुरुष व स्त्रिया या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत . वडार समाजाची मुले शिक्षणा पासून वंचित राहत आहेत . त्यात भर म्हणून कि काय १९६१ च्या पुराव्याची अट ?
कधी कधी असे वाटते आहे , असला कसला हा वैभवशाली भारत देश ? हे जे स्वतंत्र आपल्याला भेटले आहे ते ठराविक लोकासाठी तर नाही ना ?
आज राज ठाकरे यांची जीवनशैली पाहिली , राजकीय लोकांची जीवनशैली पहिली कि वाटते यांना सामान्य लोकाशी काहीही घेणे देणे नाही आहे . यांना फक्त सत्ता हवी आहे . व काही लोक यांना गुलाम म्हणून हवे आहेत . यांची मानसिकता हीच आहे .
आज राज ठाकरे पुण्यात येत आहेत , मोठी जंगी सभा होईल , शब्दांचे बॉम्ब व शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले जातील , काहीजण निशाण्यावर असतील , राजकारणातील चाली खेळल्या जातील .
परंतु या निमिताने मला मनसेची वडार समाजाच्या रास्त मागण्या बाबतीतील त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका जाणून घ्यायची आहे . अशी भूमिका जाणून घेणे हा आमचा हक्क आहे कारण वडार समाजाचे खूप कार्यकर्ते हे मनसे मध्ये कार्यकर्त्या पासून पदाधिकारी पदा पर्यंत कार्यरत आहेत . व वडार समाजात मनसेचे खूप मतदार आहेत .
मनसे पक्ष असा राजकीय निर्णय जरी घेवू शकत नसला तरी त्यांनी तो जाहीर करावा , परंतु अपेक्षा आहे मनसे वडार समाजाची मागण्यांना पूर्ण पाठिंबा देवून तसे समर्थन हि देईल .
आम्ही फक्त मनसे लाच नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी पूर्वी प्रत्येक पक्षाला आमचे अशा पद्धतीचे निवेदन देणार आहोत .
जो आम्हाला साथ देईल , आम्ही त्यांच्या सोबत असू . जो आम्हाला वाटण्याच्या अक्षदा दाखवील त्यांना आम्ही कायमच्या अक्षदा देवू व जिथे जमेल तिथे उमेदवार पाडण्यासाठी मोलाचे योगदान देवू .
वडार समाजाला आमच्या मर्यादा माहित आहेत , तशी शक्तीस्थळे हि माहित आहेत . बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार कुणीही आमच्या पासून हिरावून घेवू शकत नाही . वडार समाजाला अद्याप कुणी हि प्रतिनिधित्व दिलेले नाही , आम्ही स्वताच्या बळावर जरी निवडून आलो नाही तरी आम्ही प्रस्थापितांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही .
६६ / ६७ वर्षे होवून गेले आहेत स्वातंत्र्याला …… आमचा अजून हि विचार होत नाही … ? ? ?
जय बजरंग . . . जय वडार ….
जय हिंद . . . जय महाराष्ट्र
No comments:
Post a Comment