Thursday, February 6, 2014

एका वडार समाज बांधवाची वेदना . . .



एका वडार समाज बांधवाची वेदना . . . 

आपले समाज बांधव श्री बजरंग धनवट रात्रीचे दोन वाजता मला सांगत होते . . .

" मी तेंव्हा ३ वर्षाचा होतो , माझ्या पाठीवरील धाकटा भाऊ दीड दोन वर्षाचा होता व माझी सर्वात छोटी बहिण तेंव्हा आई च्या पोटात होती … तेंव्हा माझा बाप गेला हो सर , मला माझा बाप काळा का गोरा मला काहीच आठवत नाही हो . . . पोटासाठी गावोगावी फिरून , रोज गाव बदली करून अचानक आजारी पडल्यामुळे काहीही उपचार न करता आल्यामुळे माझा बाप गेला हो . आज माझ्या कडे सर्व सुख आहे पण माझा बाप मला माहित नाही हो कसा होता तो . साहेब , त्यामुळे जीव तुटतो व कुणा आपल्या वडार बांधवावर अशी वेळ येवू नये म्हणून मी जिथे समाजाचा कार्यक्रम असेल तिथे पोहचत असतो , हा आपला वडार समाज सुधारावा म्हणून , मी वाटेल ते करायला तयार आहे . "

पहारीसारखे पिळदार शरीर असलेला हा गोरा गोमटा धिप्पाड शरीर यष्टीचा व्यक्ती येवढा भावनिक असावा असे वाटलेच नव्हते . नंतर त्यांनीच सांगितले कि ते मिलिटरी मधून मेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत .

. . . . वडार समाज संघाच्या जालना येथील चिंतन शिबिराला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून रात्री आकरा वाजता प्रवास सुरु केला . कॅलेंडर वाले म्हणून माझे खूप चांगले स्वागत केले गेले . श्री धनवट साहेब यांच्या हातात कॅलेंडर होते व ते वाचतच होते व मीच समोर आल्याने त्यांना खूप आनंद झाला होता . माझी एक दोन तास तरी ते स्तुती करत असावेत येवढा त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे .

ते पुढे सांगत होते . . .

" मला वडिलांबद्दल काहीही माहित नाही , जे काही आई सांगते व अन्य लोक सांगतात तेवढेच माहित आहे . लोक सांगतात कि तुझा बाप खूप तगडा होता व काय कुस्ती खेळायचा ?, एकदा जोर मारायला लागल्यावर ५०० / १००० झाल्या शिवाय थांबायचा नाही . "

" परंतु वडार समाजात जन्माला आल्यामुळे पोटासाठी दररोज गाव बदली करायला लागायचे , आई सांगते कि आमच्या कुटुंबा सोबत तेंव्हा चुलत भावंडाचे वगैरे ३ / ४ पालं असायचे व गावात कुणी उतरू देत नव्हते त्यामुळे कुठेतरी ओढयाच्या कडेला अथवा म्हसनवट्यात ( स्मशान भूमीत ) थांबायला लागायचे . उपासमार व अन्न साठी विवंचना तर सतत असायचीच . "

" असेच एका दिवशी एका सावकाराची थोडी बाकी असल्यामुळे त्याची बाकी चुकती करून पुढील गावाला निघायचे होते , बाकीच्यांची बिऱ्हाडे पुढे गेली होती व आमचे एकच बिऱ्हाड म्हसनवट्यात त्या दिवशी मुक्कामाला होते . "

" मला तर काही आठवत नव्हते व कळत हि नव्हते पण त्या दिवशी माझा बाप मध्य रात्रीच्या वेळी उठला व बाहेर गेला , परंतु परत आला तेंव्हा त्यांच्या अंगावर एक हि कपडा नव्हता . त्यांनी पूर्ण कपडे काढलेले होते व काही तरी बडबडत होते . संपूर्ण अंग तापाने फ़नफ़नलेले होते , आई ने त्यांना विचारले - काय झाले ? असे काय करताय ? परंतु माझ्या बापाला झपाटल्या सारखे काहीतरी झाले होते . "

" रात्रीची वेळ , सगळीकडे अंधार दाटलेला , ते दोघे जाणते व आम्ही दोघे भाऊ काहीही कळत नसलेले व आई च्या पोटातील वाढीला लागलेले बाळ . . . कुणाला आवाज द्यायचा ? कोण मदतीसाठी येणार ? वडाराच घर उघड्यावर म्हणतात तसा संसार , कुणाला काय लागून गेले आहे इथे कुणी मरो अथवा उरो . नात्या - गोत्यातील जे होते ते पुढे निघून गेलेले . काय करावे ? "

" बापाची अवस्था खूप वाईट झाली होती , अचानक असे काय झाले , काहीही कळायला मार्ग नव्हता . सकाळची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते . सकाळ झाली . परंतु पुढे काय करायचे हे अडाण्या माणसाला काय कळावे ? शेजार गावाच्या सरकारी दुकानात न्यायचे ठरले , आम्हा दोघा भावांना घरी ठेवून माझी आई माझ्या बापाला घेवून निघाली . पैसे तर सोबत नव्हतेच परंतु तरीही निघाली , कपाळाचे कुंकू होते , काहीतरी करणे भाग होते . बापाची तब्येत अजूनच खराब होत चालली होती . त्या हि परिस्थितीत गयावया करून , कुणाचा तरी आधार घेवून गावा पर्यंत त्यांना आणले परंतु पुढील गावा पर्यंत न्यायचे तर काहीही मार्ग नव्हता , कुणी गाड्या मध्ये हि बसवून घेत नव्हते . माघे आम्ही दोघे जन भुकेने व्याकुळ होतो परंतु आमचे दुख आम्हाला आता आठवत नाही . परंतु ते आई ला कळत असावे . तिची खूप तगमग चाललेली होती , आम्हाला व जेवढा संसार आहे तेवढा संपूर्ण संसार उघड्यावर ठेवून ती जीवाचा आटापिटा करत होती . मध्येच वडिलांना तिथे एकटेच सोडून ती आम्हाला पाहायला आली होती असे आई सांगत असते . "

" पुढे कसे तरी , कुठल्यातरी वाहनाची सोय झाली , वडिलांना दवाखान्यात नेण्यात आले परंतु खूप उशीर झाला होता . "

" साहेब , माझा बाप असाच अचानक निघून गेला हो , लोक सांगतात त्यांना दारू चे हि व्यसन नव्हते , खूप चांगले चांगले बोलतात . जे काही आई वडिलांबद्दल सांगते तेवढेच आम्हाला माहित आहे "

" आपल्या वडार समाजाच्या कुठल्याही समाज बांधवावर हि वेळ येवू नये . कुणाचेही आई - बापाचे छत्र हिरावले जावू नये . कुणीही अचानक अनाथ होऊ नये असे मला खूप वाटते . "

" वडार समाजाचा कुठे हि काही कार्यक्रम असेल तर मी तिथे नक्की जातोच सर , मला जरी कळले कि कुणी वडाराचा आहे तरी मी त्याच्याकडे जावून त्याच्याशी बोलतो . "

. . . . . श्री धनवट सांगत होतो व मी दगड बनून ऐकत होतो . त्यांना मला भेटून खूप आनंद झाला होता . ते माझी शब्दा शब्दाला स्तुती व गौरव करत होते , माझ्या सारखा माणूस त्यांना आयुष्यात भेटला नाही इतपर्यंत त्यांचे म्हणून झाले परंतु माझे मन त्यांच्या आई ने ह्या भयंकर घटने नंतर कसे सांभाळले असेल या भोवतीच घुटमळत होते .

श्री धनवट साहेब यांनीच नंतर खुलासा केला - " लहानपण किती वाईट गेले हे सांगण्याच्या पलीकडचे आहे , माझे शिक्षण आश्रम शाळेत झाले . जेवणाची भयंकर आभळ असायची , कालवण वाढले जायचे त्याला फक्त कलर असायचा व त्यात आळ्या ह्या ठरलेल्याच असायच्या . खाण्या वाचून गत्यंतर नसायचे , खूप भूक लागायची , शाळेला दांडी मारून , कुणाच्या शेतात जावून कुणाची गाजरे चोरायचो , कुणाचे तंबाटे चोरायचे , कुणी पकडले कि ते खूप मारायचे पण खूप भूक लागलेली असायची . कधी बाजारात गेलो कि तिथे केळी खावून कुणी साल कधी टाकतोय त्यावर अधाशा सारखे पाहायचो व ती साल उचलून खायचो . "

" साहेब , तुम्हाला खरे सांगतो - मी माझ्या शिक्षणाचा खर्च माझा मीच केला , वाटेल ते काम केले परंतु शिक्षण घेत राहिलो . त्यात मी कब्बडी खूप चांगला खेळायचो , कब्बडी तील लॉंग जंप व पाय मारणे हे मी खूप अफलातून रित्या करायचो व त्या बळावर मी माझ्या शाळा कॉलेज मध्ये कॅप्टन झालो होतो . कॉलेज ला असताना एक असेच मोठे बक्षीस मिळाले होते , ते स्वीकारायचे होते परंतु माझ्या कडे कपडेच नव्हते , एका मित्राची आखूड व पार्श्व भागावर दोन्ही ठिकाणी फाटलेल्या चड्डीवर मी ते बक्षीस स्वीकारले होते . त्यावेळी मोठ मोठाले घराच्या मुलाकडे सर्व काही होते परंतु मी त्यांचा माझ्या खेळा मुळे कॅप्टन होतो याचा मला खूप अभिमान वाटत आहे . "

असे हे आपले श्री बजरंग धनवट साहेब हे पुढे कब्बडी च्या त्यांना अवगत असलेल्या तंत्राच्या जोरावर मिलिटरी मध्ये सामील झाले . त्यांनी देशाची यथायोग्य सेवा हि केली . एवढेच नाही तर आपल्या सर्वाना माहित असलेले कारगिल युद्धात त्यांनी सहभाग हि घेतला होता . ते ज्या ठिकाणी युद्ध भूमीवर होते तिथे एक शत्रू पक्षाचा बॉम्ब अचानक येवून पडला व त्यात त्यांचे ३० / ३२ सहकारी क्षणार्धात देशाच्या क|मी आले होते . श्री धनवट साहेबांचे नशीब बलवत्तर म्हणून ते आज आपल्या सोबत आहेत .

असे हा अनुभवाने सिद्ध झालेला आपला वडार समाज बांधव आज आपले सुखी आयुष्य जगत आहे . गावी आल्या नंतर यांनी आपल्या गावात राजकारणात सहभाग घेवून उप सरपंच पदा पर्यंत जावून गावाची चांगलीच सेवा केली आहे . परंतु आपल्याच काही वडार समाजातील घर भेद्यानी त्यांच्या विरुद्ध षंड रचून त्यांना बदनाम व वेगळे करण्याचा प्रयत्न केला . परंतु वडार समाजात दुफळी नको म्हणून त्यांनी गाव सोडून पुण्याला आलेले आहेत . मध्यंतरी त्यांनी सिविल डिप्लोमा केला होता त्या जोरावर आता ते एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आपली जबाबदारीची नोकरी करत आहेत .

मला धनवट साहेब सांगत होतो . साहेब तुम्ही कधीही सांगा , मी गावाकडून २००/ ३०० लोक कधीही आपल्या कार्यक्रमाल घेवून येत जाईल . मला खूप इच्छा आहे वडार समाजातील लोकासाठी काम करण्याची . मला तुम्ही आवर्जून काही कार्यक्रम असेल तर सांगत चला .

जालना येथील चिंतन शिबीर यशस्वी तर झाले आहेच , मी त्या बद्दल समाधानी हि आहेच व त्यावर मी सर्व समाज बांधवाना चांगली बातमी हि सांगणार आहे .

परंतु मला श्री धनवट साहेबा सारखे काही व्यक्ती भेटल्या कि अजून खूप हुरूप येतो . श्री धनवट व अशाच काही निवडक लोकामुळे मी इथे अजून टिकून आहे . आपल्या वडार समाजात अशा काही व्यक्ती आहेत त्यांच्या भावनांना ओलांडून पुढे जाऊशी वाटत नाही .

श्री धनवट साहेबा बरोबर च्या एकाच रात्रीत पुढील कित्येक वर्षांचा स्नेह दडलेला असेल याची मला पूर्ण खात्री आहे .

अशाच काही लोकामुळे माझीही ओळख आहे , माझे हि व्यक्तिमत्व खुलते आहे .

जय बजरंग . . . . जय वडार

No comments:

Post a Comment